तरुण भारत


आपला भारत देश हा तरुणांच्या कौशल्यावर प्रगतिशील आहे.बराचसा तरुण वर्ग हा आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आज धडपड करत आहे.कोणी स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करतो,कोणी डॉक्टर,इंजिनिअर,व्यावसायिक तर कोणी वकील,जज इत्यादी असे बऱ्याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.परंतु या वाटचालीत त्याला बऱ्याच अपयशांना सामोरं जावं लागतं,कधी कधी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हवं ते यश मिळत नाही.अशा अपयशातून नैराश्य,आत्महत्या सारखे विचार,खचून जाणे व आपले स्वप्न अर्ध्यात सोडून निराश होऊन आपल्या इच्छा आकांक्षा यांचा बळी दिला जातो.
मला त्या सर्व तरुण वर्गाला एक जाणीव करून द्यायची आहे की जर अपल्याला इच्छुक यश मिळत नसेल तर त्याचा दोष नशिबाला न देता आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत हे लक्षात ठेवायला हवं.निश्चित यश हवं असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करायला हवा.प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा अनुकूल यश आपल्या पराक्रमाने महाराजांनी मिळवलं.योजना,नियोजन,योग्य दिशा व उद्दिष्ट काय आहे हे सगळं जाणून त्यानुसार आपली पावलं त्या दिशेने महाराजांनी उचलली.निश्चित यश मिळवायचं असेल तर आपल्याला शिवचरित्र वाचन गरजेचे आहे त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे.प्रयत्न काय असतात हे बाजी प्रभूंची घोडखिंडीतील लढाई वाचल्यावर लक्षात येईल.फक्त सहाशे मावळे घेऊन बाजी प्रभू महाराजांना म्हणतात”राजे आपण निघा,हा बाजी प्रभू इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत शत्रू ला एक पाऊलही पुढे सरकू देणार नाही,राजे हा आपला बाजी स्वतःच्या छातीचा पर्वत बनून शत्रूच्या पुढे उभा राहील.”कुठे सिद्धी जोहर चा प्रचंड सेना समुद्र व कुठे बाजींचे फक्त सहाशे मावळे?परंतु तरीही प्राणपणाने लढून आपल्या महाराजांसाठी,स्वराज्याच्या सुर्यासाठी बाजी व त्यांचे थोरले बंधू फुलाजी लढतात.महाराज विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचा आवाज होईपर्यंत प्रचंड आणि अफाट शौर्य दाखवून बाजी आपली प्राणज्योत शांत करतात.यश मिळवायचं असेल तर आपल्या कुवतीपेक्षा जास्त प्रयत्न आपले हवेत तेव्हाच यश आपल्या पदरात पडणार.बाजींचे हे शौर्य तो पराक्रम हा त्यांच्या कुवतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.व महाराजांप्रति असलेली निष्ठा व स्वराज्याची अस्मिता लक्षात ठेवून बाजींनी आपले प्राण अर्पण केले.आपलीही आपल्या उद्देशाकरिता तशी निष्ठा असायला हवी.तरच आपण यशाचं शिखर गाठू शकतो.असे कितीतरी उदाहरण,कितीतरी पराक्रम आपल्या शिवचरित्रात दिसतील.प्रत्येक पराक्रम हा कुवतीपेक्षा जास्तच होता.लाल महालातील एक लाख सैन्य असलेल्या शाहिस्तेखानाच्या महालात फक्त आणि फक्त शंभर मावळे घेऊन मारलेला छापा ते शाहिस्तेखानची बोटे तोडण्यापर्यंतचा पराक्रम हा काही साधा नाही.कुठे कोंडाजी फर्जंदचे फक्त साठ मावळे व कुठे मुघलांचा सेना सागर तरीही पन्हाळा कोंडाजींनी जिंकलाच.कोणी पण या असल्या पराक्रमाला वेडेपणा म्हणेल परंतु या वेडेपणातून तर या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत.या वेडेपणातून स्वराज्याच स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.हा असला वेडेपणा असेल तर आपण कुठलंही यश गाठू शकतो.फक्त तो वेडेपणा सत्याचा असायला हवा,सत्कारणी असायला हवा व महाराजां सारखे प्रयत्न व नियोजन असायला हवं तरच आपण कीर्ती करू शकतो.
मित्रांनो आपले प्रयत्न हे जास्तच असू द्या.प्रमाणापेक्षा जास्त प्रयत्न हेच तुमच्या यशाचं गुपित असणार आहे.उद्या आपल्याला अशी म्हणायची पाळी येऊच नका देऊ की”अरे आपण थोडं आणखी अभ्यास केला असता,थोडे आणखी प्रयत्न केले असते तर आज परिणाम हे काही वेगळेच असते”.अशी वेळ येऊ देऊ नका,प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना आपले आदर्श मानून त्या दिशेने प्रयत्नशील राहा.शिवचरित्र अभ्यासा त्यातून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल.कधीही निराश न होता सकारात्मक विचार करून हळू हळू प्रगती करत राहा.
यश तुमची वाट पाहत असेल म्हणून चला कामाला लागा.
जय शिवराय जय शंभूराजें🙏
शुभम सिरसाठ,अमरावती
९४०५३०१६१४

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started