।स्त्री।
🇮🇳 भारत माता कि जय🇮🇳
लिहिलेल्या पहिल्याच ओळीत आपण आपल्या देशाला,आपल्या मातृभूमीला मातेचा दर्जा देतो तिथे खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीचे दिव्य दर्शन दिसून येते.परंतु प्रश्न हा आहे कि खरंच आपल्या देशातील माता-भगिनींचा दर्जा हा आज सुधारला आहे का,कि समाजाने निर्माण केलेल्या काही प्रथा-परंपरांमध्ये अडकून बसला आहे.खर तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्या आजच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच दिसून येते.
आजही काही प्रमाणात लोकांची वृत्ती ही स्त्रीयांनी चूल आणि मूल ही एवढीच जबाबदारी सांभाळावी आणि गप्प बसावे अशीच आहे,ना तिने घरातील कुठल्या व्यवहारांमध्ये तोंड घालावे,ना त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी धारणा त्यांच्या मानसिकतेमध्ये बनलेली आहे.आजही पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये महिलांशी किंवा तरुण मुलींशी बोलताना कुठे कुठे हा अहंकार पुरुषांच्या बोलण्यातून दिसून येतो कि’ए मी का घाबरतो का तुला,मी काही तुझ्यासारख्या बांगड्या नाही भरल्यात हातामध्ये’ही वृत्ती पावलो पावली आजही मोठ्या प्रमाणात दिसून येते.काही समाजांना तर स्त्रियांचा वाढता व्यक्तिमत्व विकास हा त्यांच्या डोळ्यात खुपतो, जर स्त्रीने किंवा मुलीने पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व मिळवण्याचा जरी प्रयत्न केला तर यांचा पुरुषी अहंकार लगेच आडवा येऊन वेगवेगळी बंधन तयार करून त्यामध्ये स्त्रियांना बांधन्याचा प्रयत्न होतो.जेव्हा स्त्रियांना म्हणतात कि ए मी का घाबरतो का,मी काही बांगड्या नाही घातल्या म्हणजे आपण किती मर्दानगी आणि पराक्रमाची भाषा बोलत आहे असं स्वतःला वाटते,पण खरं तर या भाषेमध्ये पण हा स्त्रियांचा अपमानच आहे,कारण बांगड्या घालणे हे स्त्रीच काम आहे व ही स्त्री म्हणजे दुबळेपणाच आहे,तिला दुबळी ठरवण्यात येते.कुठे तर आजही हुंडा प्रथा ही आहेच,आणि त्याची बळी ही आपली मुलगी,स्त्रीच होते.हुंडा देऊन ही सासरी गेल्यावरही तिच्या वाटेला येणारे काही अपमान आणि गलिच्छ भाषा ही काही संपत नाही,तिच्या आईवडिलांच्या विषयी बोल्ल जात,हेच शिकवलं का तुझ्या आईवडीलांनी वगैरे वगैरे असे कितीतरी शोषण होते.ज्या घरात मुलगी जन्माला येते तिथेही म्हणतात कि मुलगी म्हणजे परक्या घराची संपत्ती,आणि ज्या घरात ती सुण म्हणून जाते तिथेही तिला म्हणतात कि ही तर परक्या घरची आहे मग मुलीच घर कोणतं आहे.अरे तिला परकच समजतो तर तीच अस्तित्व तरी कुठे आहे,तीच घर कोणतं आहे.समाजाने निर्माण केलेल्या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीच अस्तित्व हरवून जाताना दिसते तेव्हा मला सावित्रीबाई फुले डोळ्यासमोर दिसतात,मला आनंदीबाई जोशी दिसतात,मला मदर टेरेसा दिसतात,मला शिवाजी आणि संभाजी घडवणारी राजमाता जिजाई दिसतात,मला सिंधुताई सपकाळ दिसतात,मला ती कल्पना चावला दिसते,मला सुनीता विलीयम्सन दिसते,मला आजची देशाची निर्मला सीतारामन दिसते,मला सुषमा स्वराज दिसते,मला रमाबाई आंबेडकर दिसते अशा कितीतरी स्त्री शक्तीचे उदाहरण मला दिसतात जे पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन यांनी असामान्य कीर्ती आपल्या देशात गाजविली आणि देशाचं किर्तीमान उंच केलं आहे.यांच्याही वाटयाला कुठेतरी अवहेलना आल्याच असतील त्या सर्वांच्यावर मात करून स्त्री सबलीकरण(womens empowerment)ची उदाहरण स्वतः बनलेली आहेत.आजही यशाची शिखर गाठताना आपल्या मुलींना कौतुकाची थाप न येता त्यांच्या वाटेल पावलो पावली घाण नजरा,व त्या नजरेने होणारे उघडे बलात्कार येतात हीच समाजासाठी शरमेची गोष्ट आहे.त्यांचा सारसपणा आपल्याला सहन होत नाही,रस्त्यावर जाताना एखाद्या मुलीने आपल्याला मोटरसायकलला ओव्हर टेक जरी केल तरी आपल्या पुरुषी अहंकार ला जसा धक्काच पोहोचतो व म्हणतो अरेच्चा माझ्यासोर गेली ही,एवढी हिची हिम्मत आणि लगेच आपल्या वाहनांची गती वाढवून तिच्या समोर जाऊन तिला मागे वळून बघतो तेव्हा जस याने खूप मोठा पराक्रमच केला आहे अशी भावना त्याला येते.हीच हीन भावना मुलीविषयी,प्रगत स्त्रीविषयी आहे म्हणून आजही कुठलीच मुलगी रसत्यावर जाताना असे म्हणूच शकत नाही कि मी सुरक्षित आहे म्हणून,करण त्यांच्याकडे बघणारा दृष्टिकोन आणि घाण नजरा यांच्या कैदेत त्या आजही अडकूनच पडलेल्या आहेत.स्त्रीचा सर्वात दुबळा विषय म्हणजे हे तीच चारित्र्य होय,तिला तिच्या चारित्र्यावरून नेहमी गुलामगिरीत ठेऊन,धाकात ठेवून वाट्टेल त्या गोष्टी करून घेणे आणि जर नाहीच केल्या तर चारित्र्याचा धाक देऊन तिला तिच्या जागेवर आणणे ही समाजाची हीन बुद्धी करत आली आहे,आणि समाज म्हणजे काही विशिष्ट अशी एखादी जात,धर्म,नाही तर समाज हा आपण बनविलेल्या काही प्रथा आणि अन्याय ज्याचे आपण समर्थन करतो ती लोक म्हणजे तो समाज होय.चारित्र्यावरून धाकात ठेऊन तिला तीच पावित्र्य सिद्ध करावे लागते हे आपल्या सीतामाईला पण करावं लागलं,कि तू अमुक वर्ष रावणाच्या कैदेत होती म्हणून तू तुझं पावित्र्य, तुझं पातिव्रत्य शुद्ध आहे की नाही म्हणून तुला अग्निदिव्य करावं लागेल.जर सीतामतेला हे सर्व करावं लागलं तर हा समाज आजच्या स्त्री कसा काय सोडेल?
आजही स्त्रीच्या हक्कांचा प्रश्न हा समोर आला कि तिची योग्यता आहे का हा प्रश्न निर्माण केल्या जातो,पण खर तर आपल्या देशातील स्त्रिया या स्वतंत्र लढ्यात पण पुरुषांशी समानता ठेऊन लढल्या तेव्हा मला सरोजिनी नायडू पण आठवतात, मला विजयालक्ष्मी पंडित पण आठवतात,मला भगतसिंग ला सुखरूप वाचवणारी दुर्गा भाभी पण आठवते तेव्हा लक्षात येते कि भारताच्या स्वातंत्र्य संग्राममध्ये पुरुषांनी जेवढे कष्ट घेतले तेवढे स्त्रियांचाही वाटा हा आहेच.मग तरीही स्त्रीच्या प्रगतीकडे बघून आपण का कमीपणा समजतो याच कारण मला आजही स्पष्ट नाहीं, त्यांचा वरचढपणा हा आज अपल्याला सलतो आहे,मी ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीमध्ये वेगळ्या वेगळ्या विभागांमध्ये स्त्रिया या सर्वोच्च स्थानी दिसतात व त्यांचं नेतृत्व ही तेवढच प्रभावशाली आहे,तेव्हा नक्कीच दिसून येते कि कमीपणा हा त्यांच्या नेतृत्वगुणमध्ये नाही तर आपल्या पुरुषी दृष्टिकोनात आहे.मागील काही काळात मुलगा हवा की मुलगी हवी हा विषय घरांमध्ये दिसायचा,आणि मुलगाच वंश वाढावा म्हणून मुलगाच हवा म्हणून हॉस्पिटल मध्ये जाऊन मुलगा आहे की मुलगी हवी हे तपासून घेत होते,आणि जर मुलगी असेल तर तिची गर्भातच हत्या करणे असे घाणेरडे प्रकार हे आधुनिक समाजामध्ये पण पाहायला मिळाले आहेत,जर प्रत्येक मुलीला असे गर्भातच मारण्यात येत असेल तर कुठली वंश वाढीची गोष्ट आपण करत आहो हा साधा विचार पण आपण करत नाही,फक्त मुलंच जन्माला घालावीत आणि मुलींची हत्या करावी याने कोण्या वंशाची वाढ होईल,फक्त पुरुषी समाज निर्माण होणार यातून हे आपल्या कुत्सित बुद्धीला का समजत नाही हीच मोठी आधुनिक समाजाची शोकांतिका आहे.
शासनाच्या काही योजना राबविण्यात आल्या त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या या आळा घालण्यात आला हे एक सुदैव म्हणावे लागेल,”बेटी धन कि पेटी”,”बेटी बचाओ,बेटी पाढाओ”या योजना फार कार्यक्षम ठरल्या आहेत त्यामुळे आज त्यांचं अस्तित्व सुधारण्यास सुरवात झालेली आहे हे दिसून येते.मानवाचे जेवढे विकासाचे अग्रक्रम आहेत तेच स्त्रीचेही आहेत ते म्हणजे साक्षरता आणि प्राथमिक शिक्षा.
जर एका पुरुषाला साक्षर केलं तर एक व्यक्ती साक्षर होते आणि जर एखाद्या स्त्रीला साक्षर केलं तर एक संपूर्ण कुटुंब साक्षर होते म्हणून आपण म्हणतो कि शिकलेली आई घर पुढे नेई.आणि यामध्ये कुठलाही पुरुषी अहंकार आडवा येण्याचं काहीच कारण नाही,तर उलट जीवनाचा दृष्टिकोन उंच ठेऊन स्त्रियांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्यासोबत त्यांचाही विकास आणि प्रगती हे आपल्या सोबत व्हावी ही एक नवी संकल्पना आपल्याला निर्माण करायची आहे.आपण आपले संकुचित अहंकार आणि चुकीच्या संकल्पना दूर ठेऊन आपल्यासोबत स्त्रियांची वाटचाल ही सारखीच व्हावी म्हणून आपण आज त्यासाठी सशक्त होणे गरजेचे आहे.खरं तर समाजामध्ये स्त्रीची उपस्थिती ही संस्कृतीच आणि शालीनतेच तसेच सौन्दर्याच प्रतीक असते.स्त्री ही सौन्दर्याच,मांगल्याचे, सुसंस्कृततेचे प्रतीक मानल्या जाते.
आपल्याला अभिमान बाळगायला पाहिजे कि देशात आणि जगात सर्वात आधी लैंगिक शिक्षण आणि कुटुंब नियोजनाची गरज आहे म्हणून आपल्या मालती बाई कर्वे यांनी केली आणि त्यांचे पती राधो कर्वे यांनी केली.
म्हणून आज आपल्या समाजातील स्त्रीकडे बघण्यात येणारे दृष्टिकोन आणि कुत्सित प्रथा-परंपरा यामध्ये अडकून ठेवणाऱ्या संकल्पना यातून बाहेर काढून त्यांना सन्मानाने समान वागणूक आणि हक्क देऊन सोबत वाटचाल करून सशक्त भारत आणि सशक्त समाज निर्माण करण्याची गरज आपल्याला आहे.
तुमच्या यशात ती आनंद घेते,पण आनंदाच्या भरात तुम्ही तिचा उल्लेख सुद्धा करत नाही,तीच अस्तित्व सुंदर आहे परंतु आपल्याला तिच्या शरीरापलीकडे काही दिसत नाही.
ती माणूस आहे,ती आई आहे,ती बहीण आहे,ती मैत्रीण आहे,ती प्रेयसी आहे,ती पत्नी आहे,पण तुम्ही तिला फक्त आणि फक्त मादी समजता परंतु लक्षात ठेवा ती काली पण आहे,ती जगदंबा पण आहे……..🙏
शुभम रा.सिरसाठ
दर्यापूर,अमरावती